‘स्वधा’ – एक मुक्त निसर्गशाळा

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची आठवी बैठक दिनांक २८ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील ‘स्वधा – अ स्टायनर्स स्कूल’ ह्या शाळेच्या संस्थापिका आणि मुख्याध्यापिका सौ. शेफाली कोस्टा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ऑस्ट्रीयन विचारवंत आणि तत्त्वज्ञ डॉ. रुडॉल्फ स्टायनर यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित शाळा त्यांनी २०१२ मध्ये पुण्यात सुरु केली.P1120594.JPG

सौ. शेफाली कोस्टा यांनी संस्कृत वेदांत ह्या विषयात पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच प्रत्येक वेळी भारतीय शिक्षणाचा पौराणिक वारशाचा खजाना त्यांना मिळत गेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करू लागल्या. परंतु पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मिळालेला व समजलेला भारतीय शिक्षणाचा पौराणिक वारसा त्यांना शांत बसू देत नव्हता. आपण कोण आहोत? कुठून आलो आहोत? आपली संस्कृती काय आहे? या आणि इतर अनेक गोष्टी ज्या भारतीय पुराणांमध्ये लिहिलेल्या आहेत त्या मुलांना लहान वयापासून समजायला हव्यात असे त्यांना वाटू लागले.
त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या विविध शाळा व तज्ञांना त्या भेट देत राहिल्या आणि त्यांच्याशी चर्चा करू लागल्या. ह्या भेटींदरम्यानच त्यांची पुणे विद्यापीठात डॉ. श्री. अरविंद गुप्ता ह्यांच्याशी भेट झाली. बोलता बोलता ते म्हणाले की, ‘स्कूल इन बच्चोंके लिये कच्ची जेल है|’ ‘कच्ची जेल’ हा शब्द त्यांच्या हृदयाला जाऊन भिडला आणि शाळा ‘कच्ची जेल’ का वाटते ह्याचे उत्तर शोधायचा त्या प्रयत्न करू लागल्या. त्या प्रयत्नात त्यांना कळाले की, खूप कमी जणांनी ह्याच उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे. ह्याबाबतीत उदासीनता दिसून आली. भारतीय शिक्षणाचा स्तर खरतर खूप उच्च आहे पण त्यात आलेल्या व्यावहारिकतेमुळे त्याचा दर्जा घसरला आहे असे त्यांना जाणवले.

मुलांना शाळा ही कच्ची जेल न वाटता आनंद मिळण्याचे ठिकाण वाटले पाहीजे व अशा पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या शाळा व पद्धतींचा शोध व भेट देणे त्यांनी सुरु केले. ह्या भेटींदरम्यान त्यांना ऑस्ट्रीयन विचारवंत आणि तत्त्वज्ञ डॉ. रुडॉल्फ स्टायनर ह्यांच्या शिक्षणपद्धतीबद्दल कळाले आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीवर त्या भारावून गेल्या आणि अशा पद्धतीची एक शाळा सुरु करण्याचे त्यांनी ठरवले आणि ‘स्वधा – अ स्टायनर्स स्कूल’ सुरु झाली.

डॉ. रुडॉल्फ स्टायनर ह्यांच्याबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या की, स्टायनर हे ऑस्ट्रियन विचारवंत होते. त्यांना युरोप चे ऋषी असेही म्हटले जाते. युरोपमध्ये ब्रम्हविद्या चळवळीचे (Theosophy Movement) ते नेते होते. ब्रम्हांडामधील सर्व नक्षत्र व तारे यांना एकत्रित करून ते शेती विषयक मार्गदर्शन करत असत. त्यामुळे त्यांना Father of Bio-dynamic Agriculture असे म्हणत असत. त्यांनी Anthroposophy या तत्वाच्या आधारे मानव शास्त्राचा आधार घेऊन बालकांचा मानसिक व कृतीशील विकास साधायचा प्रयत्न केला आहे.P1120595.JPG मानवाच्या विकासाच्या प्रवासाच्या अनुरूप आपले शिक्षण असणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.त्यांच्या मते, प्रत्येक मुल हे त्याचे शरीर, आत्मा आणि इच्छाशक्ती ह्या तीन गुणधर्मामुळे बहुआयामी बनते. त्यामुळेच त्यांची  शिक्षण पद्धती ही शरीर, मन आणि आत्मा ह्यांना पुरस्कृत करते. शरीर, मन आणि आत्मा ह्या तीनही गोष्टींमध्ये वयाच्या ठराविक टप्प्यानुसार बदल होत असतात. त्यांच्या मते दर ७ वर्षांनी मानवी आयुष्य हे बदलत असते. मानवाचा विकास समजून घेण्यासाठी त्यांनी मानवी विकासाच्या वयानुरूप तीन पायऱ्या दिल्या आहेत :-

१.        वय वर्ष १ ते ७
२.        वय वर्ष ७ ते १४
३.        वय वर्ष १४ ते २१

शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना निरोगी, मजबूत आणि मुक्त बनवणे हा त्यांच्या शिक्षणपद्धतीतला मुख्य उद्देश्य आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येक मुलाला आदराने स्वीकारा, प्रेमाने त्याचे पोषण करा आणि मग त्याला स्वातंत्र्य उपभोगायला पुढे जाऊ द्या’. त्यांचे शैक्षणिक कार्य व अभ्यासक्रम हे मानवी विकासाला आवश्यक अशा ह्या शरीर, मन आणि आत्मा ह्या तीनही गोष्टींचा गर्भितार्थ सांगते. ह्या सगळ्या तत्त्वज्ञानावर आधारित असा अत्यंत सुरेख तयार झालेला अभ्यासक्रम मुलांच्या स्वभाव, भावना, विचार इत्यादींशी सुसंगत असा आहे. निसर्ग, प्राणी, पक्षी इ. चा वापर करून मुलांना ह्या शाळांमध्ये शिकवले जाते. त्यांना कुठल्याही प्रकारचे पुस्तक नाही. मुलं स्वत:चा अभ्यासक्रम स्वत: बनवतात. त्यांच्या अभ्यासपद्धतीत रात्रीला खूप महत्व आहे. मुलांना काहीही नवीन शिकवल्यानंतर एक रात्र मध्ये गेल्याशिवाय दुसरी गोष्ट शिकवली जात नाही. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम स्विकारणारी पहिली स्टायनर्स स्कूल ही १९१९ मध्ये जर्मनी येथे सुरु झाली व भारतामध्ये १९९७ मध्ये हैद्राबाद येथे सुरु झाली. आता संपूर्ण जगात अशा पद्धतीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मुंबईमध्ये सुरु असलेली त्रिधा नामक शाळा आता १२ वी पर्यंत आहे. अशाच पद्धतीची एक शाळा २०१२ मध्ये पुणे येथे आपल्या ह्या कार्यक्रमाच्या वक्त्या सौ. शेफाली यांनी सुरु केली. सध्या शाळा ३ री इयत्तेपर्यंत असून पुढील वर्षी ४ थी इयत्ता सुरु करण्यात येणार आहे. अशा वेगळ्या पद्धतीत शाळा शिकलेल्या मुलांना पुढे नेहमीच्या पद्धतीने सुरु असलेल्या शाळांमध्ये अथवा महाविद्यालयात प्रवेश मिळतो. P1120600.JPGत्यामुळे ही वेगळी पद्धत आणि नेहमीची शिक्षण पद्धत ह्यात ताळमेळ साधला जातो. अशा पद्धतीची शाळा सुरु करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येण्याचे त्यांनी आवाहन त्यांनी या वेळी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या अधिकारी श्रीमती मधुरा कुलकर्णी ह्यांच्या हस्ते शाळेस भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. ‘स्वधा – अ स्टायनर्स स्कूल’ ह्या शाळेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर आणि ई-मेल पत्त्यावर संपर्क करावा.

‘स्वधा – अ स्टायनर्स स्कूल’
सौ. शेफाली कोस्टा
०९८२२०२३२६५/९४२२९६८७२५/०२०-२५२८००२०
swadhaschool@gmail.com

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: