लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची सातवी बैठक दिनांक २३ डिसेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून भोर जिल्ह्यातील केंजळ या गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. के. पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेतील या शाळेमध्ये प्रायोगिक तत्वावर ज्ञानरचनावाद आणि कृती आधारित शैक्षणिक उपक्रमांवर भर देऊन सदर उपक्रम राबवण्यासाठी पाटील सरांनी प्रयत्न केले आहेत. सदर शाळेतील अनुभवावरून पुढे भोर तालुक्यातील इतर ३० शाळांमध्ये हा पॅटर्न यशस्वीपणे राबविण्यात आला व आता हा कृती आधारित शिक्षणाचा प्रयोग संपूर्ण राज्यात गिरवण्यास सुरुवात झाली आहे. सदर उपक्रमाकरता निवृत्त शिक्षण अधिकारी श्री. प्रकाश परब यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
बैठकीचा थोडक्यात वृत्तांत:
श्री जे. के पाटील सर हे मुळचे कोल्हापूर विभागातील. नोकरीच्या निमित्तने भोर परिसरात केंजळ या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले व आज ते या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यभार पाहतात. त्यांनी शासनाने तामिळनाडू येथे आखलेल्या एका प्रशिक्षणामधून ओळख झालेला ‘कृती आधारित शिक्षणा’ चा प्रयोग, शासनाच्याच सहकार्याने त्यांच्या केंजळ येथील शाळेत सुरु केला. सदर शाळेत हा उपक्रम यशस्वीपणे राबविलया नंतर भोर तालुक्यातील ३० शाळामध्ये तो सुरु केला गेला व प्राथमिक शाळांमध्ये कृती आधारित शिक्षण गिरवण्यास सुरुवात झाली. ३० शाळांपासून सुरु झालेला हा उपक्रम आता राज्यभरातील दीड हजार शाळांपर्यंत पोहोचला आहे.
ज्ञानरचनावाद ही संकल्पना ८० च्या दशकात श्री. जेन पीआगेट ह्या शिक्षण तज्ञाने मांडली. कृतीतून मुलाने शिकणे अत्यंत महत्वाचे आहे असे त्यांचे म्हणणे होते व त्यातून ह्या मॉडेलचा उद्य झाला. श्री. जे. के. पाटील सरांनी ज्ञानरचनावादाची संकल्पना अत्यंत सोप्या पद्धतीने मांडली ती म्हणजे मुलाने स्वत: कृती करत शिकणे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिकण्याची एक कला असते आणि विद्यार्थ्यांना स्व:-अनुभव दिल्याशिवाय तो पूर्णतः कोणतीही गोष्ट शिकणार नाही. प्रत्येक मुलाच्या कुवतीनुसार आणि त्यांच्या आवडीनिवडीनुसार शिक्षण दिल्यास ते नक्की शिकेल असे त्यांचे म्हणणे आहे. शिकण्याची व शिकवण्याची पद्धत ही अत्यंत लवचिक आहे आणि ती केवळ पाठ्यपुस्तकावरच आधारित असण्याची आवश्यकता नाही.
सरांच्या म्हणण्यानुसार शिक्षण ही निरंतर बदलत जाणारी प्रक्रिया आहे. पारंपारिक शिक्षण पद्धतीतील त्रुटी दूर करण्यासाठीचे अनेक प्रयत्न आपणास पहावयास मिळतात मात्र ही पद्धतच बदलण्याकरता हा कृती आधारित शिक्षणाचा मॉडेल त्यांच्या शाळेत राबवण्यात येत आहे. हे मॉडेल इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत सध्या तयार आहे. पुढील वर्गासाठी project based learning माध्यमातून तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. शाळेत इयत्तावार वर्ग नाहीत. विषयानुसार लॅब आहेत ज्यामध्ये त्या त्या विषयाचा अनुभवातून विद्यार्थी अभ्यास करतात. शाळेत कुठल्याही प्रकारचे वेळापत्रक नाही. कामामध्ये लवचिकता ठेवली गेली आहे. सरांच्या म्हणण्यानुसार दर्जेदार शिक्षण शाळामधून देण्यासाठी हे कृती आधारित मॉडेल मदत करते. शिकणे हि एक नैसर्गिक संकल्पना असून मुलाला स्वत: अनुभव दिल्याशिवाय समजू शकणार नाही.
मुल २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाही असं सरांचा अनुभव सांगतो. शाळेमध्ये मुल ८ तास अभ्यास करत असत आणि त्या ८ तासात शिकवलेल्या किती गोष्टी तो मनापासून ऐकतो हे सांगणं कठीण आहे. त्याला जर कृतीतून शिकवलं तर ते नक्कीच लक्षपूर्वक प्रत्येक गोष्ट शिकेल. सरांच्या म्हणण्याप्रमाणे हा संपूर्ण प्रयोग भाषणाच्या माध्यमातून समजावून सांगणे फारच अवघड आहे. त्यापेक्षा शाळेमध्ये प्रत्यक्ष जावून तो अनुभवून समजावून घेण्यास हवा. त्यांच्या शाळेमध्ये महिन्यातील १५ व ३० तारीख भेट देणार्यांसाठी राखून ठेवली आहे. आज पर्यंत हजारोंच्या सांख्येन शिक्षण व निगडीत लोकांनी शाळेस भेट दिली आहे. ज्यांना हा प्रयोग समजावून घ्यायचा आहे अशा सर्वाना सरांचे शाळा भेटीच आग्रहाचे निमंत्रण आहे.
हे मॉडेल बघण्यासाठी शाळेस भेट द्यायची असल्यास दर महिन्याच्या १५ व ३० तारखा राखून ठेवल्या आहेत. या तारखांना कोणीही शाळेस भेट देऊ शकते. पाटील सरांशी ९६७३९८६५३८ या नंबर वर अगर इ मेल ने संपर्क साधू शकता jkpsgk@gmail.com