पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची चौथी बैठक दिनांक २४ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. श्री. गिरीश प्रभुणे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

डॉ. गिरीश प्रभुणे
डॉ. गिरीश प्रभुणे

लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणारे व कार्यकर्ते असणारे श्री. प्रभुणे सर संघाचाच एक भाग असलेल्या ग्रामायण या संस्थेमध्ये १५ वर्ष कार्यरत होते. ह्या कार्यादरम्यानच त्यांचा फासे-पारधी, कोल्हाटी, डोंबारी, लमाण, नंदीवाले, मरीआईवाले, गोंधळी, वासुदेव इ. समाजाच्या लोकांशी संपर्क आला. परंपरागत अंगभूत कला अवगत असलेले हे लोक शिक्षणापासून मात्र वंचित आहेत असे लक्षात आल्यावर त्यांच्या या कलागुणांसोबतच शिक्षण देखील द्यायची गरज लक्षात आली. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक प्रकल्प राबवले गेले. काही वर्षांनी जेव्हा ह्या प्रकल्पांचा आढावा घेतला गेला तेव्हा लक्षात आलं की मुलांना शिक्षण देऊनही मुलं बेरोजगार आहेत. शिक्षणामुळे त्यांच्यातले नैसर्गिक ज्ञान जसे की, औषधी वनस्पतीची नाव व उपयोग इ. ज्ञान मात्र ते विसरलेत. मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या अंगात असलेले उपजत गुणदेखील निपजले पाहिजेत म्हणून, पारंपारिक गुरुकुल पद्धतीचा शोध घेण्यासाठी गुरुकुल पद्धतीनेच मुलांना शिक्षण द्यायचे ध्येय ठेऊन ९ जून २००६ मध्ये पुनरुत्थान – समरसता – गुरुकुलम संस्थेची स्थापना व सुरुवात झाली. ज्यांच्या पालकांना शिक्षण काय माहित नाही, असले तरी कोणते शिक्षण द्यावे हे माहित नाही, त्यांची मुलं भटकत राहतात त्यांच्यासाठी गुरुकुलम सुरु केलं गेलं. सध्या एकूण ४०० मुले इथे राहतात. १ ली ते १२ वी अशा इयता मुलं शिकतात. प्रामुख्याने वडार-पारधी-कष्टकरी वर्गातील ही मुले आहेत.

Shikshan Manthan Event_24092015
Shikshan Manthan Event_24092015

इयत्ता ५ वी ते ९ वी च्या मुलांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य प्रशिक्षण देखील दिलं जातं. जसे की, शेती-भाजीपाला लागवड, कंपोस्ट खत, रोपवाटिका, बांधकाम, सायकल व मोटरसायकल दुरुस्ती, प्लंबिंग, रंगकाम, कुंभारकाम इ. बरोबरच गायन, वादन, चित्रकला, लेखन, वाचन, संगणक इ. एकूण २० विभागात मार्गदर्शन केले जाते. वनौषधी, पक्षी निरीक्षण, खगोल निरीक्षण यांचाही अभ्यास घेतला जातो. याशिवाय नैपुण्य गटात विविध खेळांचे मार्गदर्शन केले जाते. आणि हे सर्व अनौपचारिक शिक्षणाच्या पद्धतीद्वारे शिकवले जाते. मूळच्या कला-कौशल्य गुणांचा विकास आणि दुर्गुणांचा ऱ्हास, आधुनिक आणि पारंपरिक ज्ञानाची सांगड घालून येथे शिक्षण दिले जाते. मुले इथेच रहात असल्यामुळे हे शक्य होते. दुपारी २.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुलं ही वेगवेगळी कौशल्य शिकतात. मुलांच्या शिक्षणाचे मूल्यमापन हे मासिक पद्धतीद्वारे केलं जातं. मुलांची तोंडी परीक्षा घेताना मुलांनी संस्कृत, हिंदी आणि स्वत:ची मातृभाषा अशा तीन भाषांमध्ये परीक्षा द्यावी असा आग्रह असतो. एकूणच मुलांच्या मनाचा कल लक्षात घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करायचा आणि आधुनिक काळाला सुसंगत असे त्यांना इथे घडवले जाते.

Shikshan Manthan Event_24092015
Shikshan Manthan Event_24092015

मुलांना शिकवणारे शिक्षक देखील निवासी शिक्षक आहेत. संस्थेच्या अल्प आर्थिक परिस्थतीमुळे शिक्षकांची निवड करतानादेखील अल्प मानधानाअभावी बऱ्याच जणांनी नोकरी नाकारली. ज्यांना परवडले ते थांबले. निवड झालेले शिक्षक रुजू झाल्यावर त्यांच्याकरता विविध प्रशिक्षणांचे आयोजन अथवा दुसरीकडे प्रशिक्षणाकरता पाठवले जाते जेणेकरून त्यांच्यातले कौशल्य अधिक विकसित व्हावेत व मुलांना त्यांचा फायदा व्हावा.

गुरुकुलम मध्ये राहण्याविषयी मुलांच्या प्रतिक्रिया काय असतात अथवा त्यांचा प्रतिसाद कसा असतो? ह्या एका श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर सरांनी सांगितले की, ‘२००६ सालापासून संस्था सुरु केली गेली. ज्यावेळी संस्था सुरु केली तेव्हाच सरांच्या मागे अनेक मुले आपल्या पालकांसोबत प्रवेशाकरता आली होती. मुलांना इथे रहायला आवडत. कारण इथे शिक्षणासोबतच वेगळी कौशल्यदेखील शिकायला मिळतात. शिवाय पोटभर अन्न खायला मिळत. त्यांना सुरक्षित वाटतं. मुलं इथे वैयक्तिक राहत नाहीत तर गटाने मिळून राहतात, एकमेकांच्या कला-आवडीनिवडी त्यांना चांगल्या माहित होतात व एकमेकांकडून ते शिकतातही.’ ह्याविषयीची एक आठवण सांगताना सर म्हणाले, ‘एकदा एका मुलाला कुठले निरीक्षण असलेले काम सांगितले

Shikshan Manthan Event_24092015
Shikshan Manthan Event_24092015

तर तो म्हणाला की, माझ्यापेक्षा हे काम दुसरा मुलगा चांगलं करू शकतो. कारण त्याची निरीक्षणकला जास्त चांगली आहे आणि मी त्याला मदत करतो. ह्यामागचे कारणाचा शोध घेतला असता कळाले की तो दुसरा मुलगा पारधी होता. पक्षाला दगडाने मारण्याची कला त्याला अवगत होती ज्यासाठी निरीक्षण चांगले लागते व त्याचे होते. त्या मुलाचे म्हणणे ऐकत ते काम त्या दोघांना करायला सांगितले आणि दोघांनी मिळून ते उत्कृष्ट पद्धतीने केले.’

श्री. प्रभुणे सरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘चतुरंग जीवन पुरस्कार’ आणि ‘जीवन गौरव अनन्य पुरस्कार’ या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

तसेच सरांची दोन पुस्तके ‘पारधी’ आणि ‘पालावरच जीण’ प्रसिद्ध झाली असून त्यांनादेखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

संस्थेच्या कामाच्या अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा व वेबसाईट लिंकवर जा.

श्री. गिरीश प्रभुणे

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम

क्रांतिवीर चापेकर विद्यालय परिसर,

गावडे जलतरण तलावाशेजारी, पांढरीचा मळा, चिंचवडगाव,

पुणे – ४११०३३

संपर्क क्रमांक : ९७६६३२५०८२

gurukulamonline.org

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s