First Meet of शिक्षण मंथन

शिक्षणाच्या क्षेत्रात ठिकठिकाणी अभिनव प्रयोग होत आहेत, अनेक विचारवंत आपला अभ्यासपूर्ण शैक्षणिक दृष्टीकोन मांडत आहेत… या सर्वांची दखल घेण्यासाठी, लेंड-अ-हँड इंडिया संस्थेद्वारे “शिक्षण मंथन” हा एक मासिक शैक्षणिक अभ्यास गटाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. दरमहा चौथ्या गुरुवारी संध्याकाळी एकत्र जमून शिक्षणातील विविध प्रवाह, प्रयोग, दखलपात्र अभिनव उपक्रम, शासनाचे शिक्षण धोरण – काही नवीन निर्णय – होऊ घातलेले बदल यांची नोंद घेणे, शिक्षण विषयक पुस्तकांवर चर्चा, शिक्षणक्षेत्राशी संबंधित पी.एच.डी. संशोधनाची माहिती घेणे असे चर्चात्मक स्वरूप “शिक्षण मंथन”चे असेल. सुरुवातीस अर्धा ते पाऊण तास मान्यवरांची मांडणी आणि त्यानंतर अर्धा ते पाऊण तास खुली चर्चा अशा प्रकारे एक ते दीड तास कार्यक्रम चालेल. लेंड-अ-हँड इंडियाचे कार्यालयीन तसेच क्षेत्रीय कर्मचारी, पदाधिकारी, हितचिंतक आणि संस्थे व्यतिरिक्त, समाजातील शिक्षण तज्ञ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कलावंत, जागरूक पालक आदींसाठी पर्यायी शिक्षण पद्धतीवर माहितीचे आदान-प्रदान करण्याचे सुलभ व्यासपीठ उपलब्ध असावे या हेतूने लेंड-अ-हँड इंडिया द्वारा “शिक्षण मंथन” हा उपक्रम सुरु झाला आहे. “शिक्षण मंथन”ची पहिली बैठक गुरुवार, दिनांक २५ जून २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती आणि यात ‘नारी समता मंच’ या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. अरुण लोहकरे यांनी ‘कातकरी खेळघर’ या प्रकल्पाविषयी माहिती दिली. याचवेळी सदर प्रकल्पाशी सबंधित डॉक्यूमेंटरीही दाखविण्यात आली. शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे कार्यरत असणार्‍या अनेक संस्थांचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवांचे आदान-प्रदान झाले. बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा गोषवारा पुढे देत आहे :- कातकरी ही महाराष्ट्रातील आदिम आणि अस्तित्व धोक्यात आलेली जमात आहे. रानोवनी भटकणारे, जंगलात मिळणार्‍या नैसर्गिक साधन संपत्तीवर गुजराण करणारे आणि पोटासाठी दारू गाळणारे कातकरी; शिक्षण आणि ठोस कौशल्या अभावी समाजाच्या परीघावर राहणारे आहेत. ‘पैसा शिळा करायचा नसतो’ या तत्वाने आज कमवायचे आणि आजच खर्चायचे ही त्यांची जीवनपद्धती. त्यामुळे भविष्याची अनिश्चितता, निश्चित ठिकाण नाही, शिक्षणाचा पत्ता नाही साहजिकच आयुष्याकडून अपेक्षाही फारशा नाहीत. कातकर्‍यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळावा यासाठी नारी समता मंचाने रेशन कार्ड, जातीचा दाखला, जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी आंबेगाव तालुक्यात दहा वर्षापूर्वी काम सुरु केले. त्यांची कागदपत्रे तयार करून घेणे, प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणे यातून काहींना प्रमाणपत्रे मिळाली पण त्याचे महत्व त्यांना जाणवले असे प्रकर्षाने दिसले नाही. तेव्हाच शिक्षणाची खरी गरज पुढे आली. आणि या गरजेतून ‘खेळघर’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. व्यवस्थेबाबत अविश्वास असणार्‍या आणि आपल्यासाठी कुणी काही करतंय हे सहजपणे न स्वीकारणार्‍या कातकरींना आपलंसं करणं हे सुरुवातीला आव्हान होतं. ते पेलण्यासाठी त्यांच्यातील मुलांकडून हे खेळघर चालविले जाऊ लागले. मुलं एकत्र यायची, गप्पा, गाणी, गोष्टी आणि अभ्यास व्हायचा. यातून मुलांची शाळा, शिक्षण याची गोडी वाढू लागली. कातकरी मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात ९ कातकरी वस्त्यांवर खेळघर प्रकल्प चालविला जातो. शाळागळती रोखावी आणि शिकणं आनंददायी व्हावं या उद्देशाने सुरु केलेल्या खेळघरातील मुलं आता कॉलेज, व्यवसायिक शिक्षण घेऊ लागली आहेत. अनिश्चित आणि खडतर आयुष्य जगणार्‍या कातकरींना आपली पुढची पिढी शिकावी असं वाटू लागलं आहे. खेळघर सुरु झाल्यानंतरची दुसरी बॅच यंदा दहावीला होती. ४ मुलं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यातील अक्षय कोळी या विद्यार्थ्याने तर ८४ % गुण मिळवत खेचरे माध्यमिक विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला, खर्‍या अर्थाने त्याने इतिहास घडवला आहे. कारण कातकरी शिकत नाहीत ही परंपरा असताना अक्षयचे हे यश खूप काही सांगणारे आहे. गेल्यावर्षी ७ मुलं दहावीच्या परीक्षेला बसली होती. सर्व मुले उत्तीर्ण झाली. यात ३ मुली आहेत. केवळ बेलावडे या एकाच पाड्यावरील ५ मुले एकाचवेळी दहावी उत्तीर्ण झाली. आणि ४ मुली दहावी व्हाव्यात हे त्याहीपेक्षा विशेष. कारण कातकर्‍यांमध्ये सर्वसाधारणपणे मुलगी वयात यायचा अवकाश तिचं लग्न केलं जातं पण या मुली शिकताहेत म्हणून परंपरा, रितीरिवाज बाजूला ठेवण्याचा पालकांचा मोठेपणाही तितकाच कौतुकाचा आहे. विशेष म्हणजे हे पालक एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी या मुलींचे पुढील शिक्षणही सुरु ठेवले आहे. यातील ५ जण अकरावी करत आहेत तर एकीने नर्सिंगचा कोर्स केला आहे. मुलांना शिकावेसे वाटावं, त्यांनी आनंदाने शिकावं, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी हा या खेळघर चालविण्यामागचा मूळ उद्देश आहे. पालकांनी पाठवल्याशिवाय मुले शाळेत जाणे अशक्य होते त्यामुळे पालकांबरोबरही काम सुरु करण्यात आले. सध्या मुळशी तालुक्यातील बेलावडे, अन्देशे, कळमशेत, कोंढुर, आंदगाव, लव्हार्डे, मोहोळनगर, ताम्हिणी आणि दावडी अशा ९ ठिकाणी खेळघर चालविण्यात येत आहे. यंदा २८१ विद्यार्थी या खेळघरात आहेत. यात मुलींची संख्या मोठी आहे. तर या खेळघरांची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्‍यांमध्ये मुली अधिक आहेत. शाळा सुटल्यावर रोज सायंकाळी २ तास, साधारणपणे ६ ते ८ या वेळेत खेळघर भरते. त्यांच्यातीलच मोठी ताई किंवा दादा, ज्यांना प्रेरक म्हटले जातं ते हा वर्ग घेतात. ताई किंवा दादा आज काय घ्यायचेय याचे आदल्या दिवशी नियोजन करतात. तर आज काय घेतले याचीही नोंद वहीमध्ये करतात. या प्रेरकांना दर तीन महिन्यातून एकदा प्रशिक्षण दिले जाते. पालकनीती परिवार खेळघराच्या तज्ञांकडून त्यांना खेळघर कसे घ्यावे, नवनवे प्रयोग कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले जाते. खेळघरात येणार्‍या मुलांसाठी दरवर्षी सहलीचे आयोजन करण्यात येते. याशिवाय प्रेरकांच्या ज्ञानात भर पडावी, इतर लोक काय करतात हे कळावे म्हणून त्यांच्यासाठी सहलींचे आयोजन करण्यात येते. मुलांना शाळेत दाखल करणे, शाळेत न जाणार्‍या मुलांशी, त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे, शिक्षकांशी चर्चा करणे आणि ते मूल शाळेत जाईल असे पाहणे, त्याचा पाठपुरावा करणे. नियमित पालकभेटी, शिक्षकांशी सातत्याने संपर्क यातून मुलांच्या प्रगतीचा आढावा घेणे अशा प्रकारे मूल शाळेबाहेर असणार नाही याची दक्षता घेतली जाते. काही वर्षांच्या प्रयत्नानंतर शिक्षकही आता या मुलांना आपलं म्हणू लागले आहेत. त्यामुळे या मुलांच्या शाळेत येण्या – न येण्याची दखल शाळा पातळीवर घेतली जाऊ लागली आहे. कामाच्या शोधात कातकरी स्थलांतरित होत असतात. त्यांच्या स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता खूप असते. तसे होऊ नये म्हणून कातकरी वस्त्यांमध्ये ‘आश्रयघरे’ सुरू केली आहेत. स्थलांतरित मुलांची व्यवस्था वस्तीतील पर्यायी पालकाकडे केली जाते. त्या मुलाच्या पालन पोषणासाठी अशा पालकांना मदत उपलब्ध करून दिली जाते. गेल्या वर्षी अशी १७ मुले आश्रयघरात राहिली होती, यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला नाही. काही कारणाने मुले पालकांबरोबर स्थलांतरित झाली तर त्याचा स्थलांतरित झालेल्या गावातील शाळेत प्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. ‘कातकरी खेळघर’ प्रकल्प राबविणारी संस्था नारी समता मंच चा संपर्क इ-मेल :- narisamata@gmail.com कार्यक्रमाच्या शेवटी लेंड-अ-हँड इंडिया संस्थेच्या सह-संस्थापक व कार्यकारी संचालिका सुनंदा माने यांनी श्री. अरुण लोहकरे तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले. लेंड-अ-हँड इंडियाने ‘शिक्षण मंथन’ प्रकल्प सुरु करण्यामागची भूमिका त्यांनी सांगितली. शिवाय संस्थेची आजवरची वाटचाल, सध्याचे उपक्रम आणि भविष्यातील वाटचाल यांबाबत माहिती दिली. सदर “शिक्षण मंथन” उपक्रमाची सुरुवात तर झाली आहे, आता पुढील बैठक गुरुवार, दिनांक २३ जुलै २०१५ रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता होईल. (कार्यक्रम स्थळ :- पुसाळकर हॉल, लाला लजपतराय विद्यार्थी भवन, विद्यार्थी सहाय्यक समिती, पँटालून्सच्या मागे, शिवाजी हौ. सोसायटी, ऑफ सेनापती बापट मार्ग, पुणे-४११ ०१६). त्याबाबतची सविस्तर माहिती पुढील महिन्यात वितरीत करण्यात येईल. लेंड-अ-हँड इंडिया ही संस्था ना-नफा तत्वावर काम करणारी बिगर-सरकारी संस्था आहे. सदर “शिक्षण मंथन” हा उपक्रम सर्व सहभागी व्यक्तींसाठी मोफत असेल, कोणतेही शुल्क त्यासाठी आकारले जाणार नाही. “शिक्षण मंथन” उपक्रमात आपण दरमहा सक्रिय सहभागी व्हावे ही नम्र विनंती. तसेच अशा उपक्रमाची आवड असेल असे आपले सहकारी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांनाही याची माहिती द्यावी, हा इ-मेल त्यांनाही फॉरवर्ड करावा, ही आग्रहाची विनंती.

Advertisements

Published by Lend A Hand India

Lend-A-Hand India is a not for profit venture launched in 2003 in New York. Currently working out of Pune, it focuses on issues related to youth. Its programs provide vocational training and career counselling to secondary school students in rural and urban communities. In addition, scholarships for pursuing higher studies, and bridge loans for those with an entrepreneurial spirit are also offered to deserving graduates from our participant schools. LAHI also collaborates with dynamic grassroot non-profit organizations to develop and implement innovative projects.

Join the Conversation

1 Comment

  1. शिक्षण मंथन हि एक अतिशय छान उपक्रमयुक्त काम करत आहे. शिक्षण प्रवाह दुर्बल स्तरातील समाजा पर्यत पोहचवणाचा आपला विचार अतिशय उत्तम आहे..

    Like

Leave a comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: